उत्सव

धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उत्सव
ग्रामदैवत पद्मावती देवीचा उत्सव – चैत्र कृ. ३/४ या दिवशी असतो. या यात्रेचे वेध सर्वांनाच असतात कारण हि यात्रा म्हणजे ग्रामस्थांच्या दृष्टीने एक दिवाळीच आहे. यात्रेनिमित्ताने बाहेर गावी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने असलेले ग्रामस्थ तसेच मित्र परिवार व नाते वाईक यानिमित्ताने एकत्र येतात. गावामध्ये बैठक होऊन त्यामध्ये यात्रेचे स्वरुप व कार्यक्रम ठरविले जातात. ही यात्रा दोन दिवस असते.

यात्रे दिवशी पहाटे देवाचा अभिषेक होतो, त्यानंतर देवीच्या मंदिरात सत्यनारायणाची महापुजा होते, सर्व ग्रामस्थ देवीला नैवैद्य दाखुन हार फुले वाहुन पुजा करतात. व नंतर सायंकाळी पंचक्रोशीतील ढोल लेझीम पथकांचा सामना होतो त्यानंतर देवीची छबीना मिरवणूक निघते. आणि नंतर देवाच्या जागराचा कार्यक्रम होतो. व रात्री १० नंतर करमणूकीसाठी लोकनाट तमाशाचा कार्यक्रम होतो.

दुसर्या दिवशी सकाळी उत्तर पुजा केली जाते. व पुन्हा दुपार पर्यंत करमणूकीसाठी लोकनाट तमाशाचा कार्यक्रम होतो.दुपार नंतर कुस्त्यांच्या आखाडाचे आयोजन होते. वर्षभर तालीमी मध्ये मेहनत करुन शरिर कमविलेल्या पैहवानांची आखाडा म्हणजे परिक्षाच असती. कुस्तीसाठी गावकर्यांच्या वतीने ५० रुपयांपासून १०००१ रुपयांपर्यंत पैहिलवानांच्या योग्यते नुसार इनाम दिला जातो.

गावामध्ये ५ दिवसाचा गणेशोत्सव सण साजरा केला जातो. या मध्ये गणेशोत्सवा काळात सर्व मंडळे धार्मिक स्वरुपाचे कार्यक्रम राबवुन समाज प्रबोधनाचे काम करतात. गणेशमंडळे आकर्षक असे ऐतिहासिक, धार्मिक दाखावे साजरे करतात.

या प्रमाणेच गावामध्ये दहिहंडी उत्सव, नवरात्र, काकडी आरती, रामनवमी, महाशिवरात्री, हनुमान जयंती, शिवजयंती, बाबा आंबेडकर जयंती, महात्मा गांधी जयंती, उमाजी नाईक जयंती हे सर्व जाती धर्माचे सण, उत्सव मोठा उत्साहाने सर्व ग्रामस्थ एकत्र साजरे करतात.

त्याचप्रमाणे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण शाळेमध्ये उत्साहात साजरे करतात. यावेळी विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतात.